Home

महात्मा फुलेंचा ‘सत्यशोधक समाज’ नेमका काय आहे?

फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा नेमका पाया काय होता, उद्देश काय होता, जेणेकरून आज दीड शतकांनंतरही त्याची चर्चा होते? याबाबत आपण अनभिज्ञच असतो.

भारताच्या सामाजिक इतिहासात महत्त्वाची घटना मानल्या गेलेल्या ‘सत्याशोधक समाजा’बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

आजच का, तर आजच्या दिवशी सुमारे 150 वर्षांपूर्वी म्हणजे 24 सप्टेंबर 1873 रोजी फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हेच निमित्त साधत फुल्यांच्या या क्रांतिकारी पावलाचे काही ठसे शोधण्याचा प्रयत्न करुया.

फुल्यांचा जन्म 1827 चा. वयाच्या विशी-पंचविशीतच त्यांनी समाजसेवेचा मार्ग पकडला.

लोकांना शक्य ती आर्थिक मदत करण्यापासून समाज सुधारणेसाठी प्रशासकीय, तसंच लोकांमध्ये जाऊन सक्रीय राहून, बदल घडवणारे समाजसेवक म्हणून फुले काम करू लागले होते.

समाजसेवेत जवळपास 25 वर्षं घालवल्यानंतर वयाच्या पन्नीशाच्या आसपास असलेल्या फुल्यांना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणींचा आणि खाचखळग्यांचा पुरता अनुभव आला होता.

पं. सि. पाटील त्यांच्या ‘महात्मा ज्योतिराव फुले’ या पुस्तकात सांगतात की, “भिक्षुकशाहीची रग कमी झाल्याशिवाय आपण पेरलेल्या सुधारणा वाढीस लागणं शक्य नाही, हे फुल्यांना लक्षात आलं आणि सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक स्वरूपाची संस्था स्थापन करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं त्यांना अगत्याचं वाटू लागलं.”

हा काळ होता 1872-73 चा. याच काळात पुण्यात ब्राह्मणेतर समाजातील काही तरूण मंडळी शाळेतून बाहेर पडली होती. त्यांनाच आपल्या चळवळीसाठी उपयोगात आणयाचं फुल्यांनी ठरवलं.

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची बिजं फुल्यांच्या या विचारात होती, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

एखादा विचार डोक्यात आला आणि पटला की, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या फुल्यांनी मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणच्या सुशिक्षत मंडळींना उद्देशून एक विनंतीपत्र जारी करत पुण्यात एक सभा बोलावली.

50 ते 60 जण फुल्यांच्या आमंत्रणाला मान देत पुण्यात दाखल झाले. हा बैठकीचा दिवस होता 24 सप्टेंबर 1873 चा. याच दिवशी फुल्यांनी ‘सत्यशोधक समाज’ नावाची ज्योत पेटवली. आज दीड शतकानंतरही फुल्यांनी लावलेली ही ज्योत अंधारलेल्या दिशांना उजेडाची मशाल बनून उभी आहे.